पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi Cabinet) यांनी नुकताच मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच फेररचना केली. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले. यामध्ये एल मुरुगन (L Murugan) यांनाही राज्य मंत्री पद मिळाले आहे. मुरुगन हे तामिळनाडू भाजपाच्या एका विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वय 44 वर्षे आहे. मोठा राजकीय संघर्ष करून त्यांनी दिल्ली गाठली आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा त्यांचे आई-वडीलच चर्चेत आले आहेत. (Central misister L Murugan story from Tamilnadu.)
मुरुगन केंद्रात मंत्री झालेले असले तरी त्यांचे आईवडील त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत आले आहेत. ते राजकारणापासून दूर तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील कोन्नूर गावात चक्क मजुरी करतात. मुरुगन मंत्री झाल्यानंतर जेव्हा पत्रकार त्य़ांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या कुटुंबाचा हा साधेपणा समोर आला आहे. कोन्नूर गावातील एका शेतात त्यांचे आई-वडील काम करत होते. एकाच्या शेतात त्यांची आई आणि दुसऱ्याच्या शेतात त्यांचे वडील राबत होते. आईचे वय 59 तर वडिलांचे वय 68 आहे.
दोघांनाही हे काम करताना पाहून पत्रकारांना धक्का बसला. त्यांच्याकडे पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही, की ते एका केंद्रीय राज्यमंत्र्यांचे पालक आहेत. धक्कादायक म्हणजे या दोघांशी चर्चा करण्यासाठी पत्रकारांना त्या शेतमालकांची परवानगी घ्यावी लागली. मुलगा एल मुरुगन मोदी सरकारमध्ये मंत्री झाला आहे. मात्र, आईवडील दुसऱ्याच्या शेतात घाम गाळत आहेत. मुरुगन हे दलित आहेत. गावात त्यांचे छोटे घर आहे. आई-वडिलांना काम मिळाले की ते जातात. इकडे मुलगा मंत्री बनत होता, तिकडे दोघे शेतातून घरी येत होते. मुलाच्या यशावर आम्हाला गर्व आहे, परंतू घाम गाळून मिळालेल्या पैशांतून भाकरी खाणे आम्हाला आवडते, असे त्यांनी सांगितले.
मुरुगन यांना कर्ज काढून शिकविले आहे. चेन्नईच्या आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये ते शिकले. यासाठी त्यांच्या वडिलांनी मित्रांकडून पैसे उधार घेतले होते. मुरुगन यांनी केंद्रात मंत्री झाल्याचे फोन करून कळविले होते. तेव्हा त्यांनी विभागाच्या अध्यक्षापेक्षा मोठे पद आहे का असा सवाल केला होता. आम्ही चेन्नईला त्याच्याकडे जात असतो. परंतू तो त्याच्या कामांमध्ये व्यस्त असतो. यामुळे आम्ही त्याला भेटून पुन्हा गावी येत, असे ते म्हणाले.