मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:52 AM2019-04-17T05:52:14+5:302019-04-17T05:52:34+5:30
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.
मोदी व शहा यांच्या भाषणांविषयी काँग्रेसने आधीच आयोगाकडे तक्रार केली आहे. यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल अन्य विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बसपच्या नेत्या मायावती यांनी तर या दोघांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवालच केला आहे.
त्यातच मोदी यांच्या संपत्ती व मालमत्तेविषयी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात दाखल साकेत गोखले यांच्या जनहित याचिकेच्या आधारे काँग्रेसने मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिल्याची तक्रार केली. या आधी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या गेल्या व या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांतील माहिती परस्परविरोधी असल्याची तक्रार करीत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी २00७च्या प्रतिज्ञापत्रात गांधीनगरच्या सेक्टर १ मध्ये ४११ क्रमांकाचा भूखंड आपल्याकडे आहे व त्याचे क्षेत्रफळ ३२६.२२ चौरस मीटर असल्याचे म्हटले होते. त्यावरील बांधकामाची किंमत ३0 हजार ३६३ रुपये दाखविली होती, पण २0१२च्या निवडणुकीत याचा उल्लेखच प्रतिज्ञापत्रातून गायब झाला. तो विकला का, याचाही उल्लेख त्यात केला नाही. त्याऐवजी ४0१ ए या भूखंडाचा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
त्यामुळे आधी दाखविलेला ४११ क्रमांकाचा भूखंड कुठे गेला व त्याऐवजी ४0१ ए भूखंड कसा आला, असा प्रश्न काँग्रेसने विचारला. गेल्या, २0१४च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी यांनी ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेख केला नव्हता, तसेच ३१ मार्च, २0१८ रोजी मोदी यांनी मालमत्तेची जी माहिती वेबसाइटवर टाकली, त्यातही भूखंड क्रमांक ४0१ ए चा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे नमूद केले आहे. जमिनीचे रेकॉर्ड तपासले असता, त्यात ४0१ ए क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच नसल्याचे आढळल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तिथे ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच आहे, तसेच ४0१ क्रमांकाचा भूखंड अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावे असून, त्यांनीही ४0१ क्रमांकाच्या भूखंडावर एकचतुर्थांश मालकी हक्क असल्याचे म्हटले आहे. या भूखंडावर जेटली व मोदी यांचा प्रत्येकी एक चतुर्थांश मालकी हक्क असेल, तर मग दोन्ही भूखंडांचे क्षेत्रफळ सारखे कसे काय, असा काँग्रेसचा सवाल आहे.
त्यामुळे आयोगाने कारवाई करून या भूखंडाच्या मालकी हक्काचा गोंधळ उघड करावा आणि नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे, हे सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
>प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारा
पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध एकापाठोपाठ एक पुरावे समोर आणून त्यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेस आता निवडणूक आयोगावर दबाव आणण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोगाने या पुराव्यांच्या आधारे कारवाई न केल्यास प्रसंगी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असे काँग्रेसने म्हटले आहे.