संगमनेर : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षांचे सरकार पाडताना आमदार खरेदीसाठी ज्यांनी भाजपला मदत केली अशा उद्योगपतींच्या आर्थिक भल्यासाठी मोदींनी नवीन कृषी कायदे आणले आहेत, अशी टीका प्रदेश काँगे्रसचे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा उर्फ एच. के. पाटील यांनी केली.
काँग्रेसने गुरुवारी राज्यात एकाच वेळी दहा हजार गावांतील शेतकऱ्यांशी व्हर्च्युअल ‘शेतकरी बचाव’ रॅलीद्वारे संवाद साधला. यात संगमनेर (नगर), अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, पालघर, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसच्या सभा झाल्या. ज्या आॅनलाईन पद्धतीने एकत्रितपणे जोडल्या होत्या. या सभांचे विविध गावांत प्रक्षेपण केले गेले. संगमनेर येथील मुख्य सभेला पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, काँग्रेसचे महासचिव राजीव सातव यांची उपस्थिती होती.
कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले, अशी टीकाही पाटील यांनी केली. थोरात म्हणाले, काँग्रेस शेतकºयांसाठी तर भाजप धनदांडग्यांसाठी आहे. बाजार समित्या बंद पाडण्याचा केंद्राचा डाव असून त्याचे दूरगामी वाईट परिणाम शेतकºयांना भोगावे लागणार आहेत. नवीन कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेस राज्यात एक कोटी शेतकºयांच्या स्वाक्षºया जमा करुन सोनिया गांधी यांच्या माध्यमातून त्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविणार आहे. राजीव सातव म्हणाले, चीनने भारतीय भूभाग बळकावला असताना व कोरोनाचे संकट असताना केंद्राने घाईघाईने कृषी कायदे केले. चर्चा न करता हे कायदे मंजूर केल्याने संसदेच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जाईल.रॅलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या सभेतून संबोधित केले. शेतकरी विरोधी कृषी कायदे निरस्त करण्यासाठी राज्य सरकारने पंजाबप्रमाणे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत नागपूरहून, औरंगाबाद येथून अमित देशमुख व बसवराव पाटील, पालघर येथून के.सी. पाडवी, ग्वालियर येथून मंत्री सुनील केदार यांनी रॅलीत मार्गदर्शन केले.
संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमास बामशी रेड्डी, बी.एम. संदीप, आशिष दुवा, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते.बाजार समितीच्या कायद्यात बदलाचे संकेतमंत्री अशोक चव्हाण यांनी बाजार समितीच्या कायद्यांमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितले. समित्यांच्या कामकाजात काही त्रुटी आहेत, त्या दूर करू. मात्र, लोकशाही मार्गाने उभारलेल्या या संस्था मोडू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.