नवी दिल्ली- रायबरेलीमधून सोनिया गांधी लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या आहेत. त्याच निमित्तानं मतदान करण्यासाठी राहुल गांधी आज रायबरेलीमध्ये आले होते. रायबरेलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे. पाच वर्षांत मोदींनी देशातली जनतेसाठी काहीही केलं नाही. मी मोदींना घाबरत नाही. माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी. 16000 हजार कोटींचं कंत्राट मोदींनी अनिल अंबानींना मिळवून दिलं. त्यातील मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींचा फायदा का करून दिला. मी खुली चर्चा करण्यासाठी तयार आहे. मोदी जेव्हा माझ्याशी समोरसमोर बोलतील तेव्हा समोर येईल. चौकीदार चोर आहेत, असंही राहुल गांधी जाता जाता म्हणाले आहेत.
राफेल डीलवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुली चर्चा करावी, असं ओपन चॅलेंज राहुल गांधींनी मोदींना दिलं होतं. राफेलमध्ये घोटाळा झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानंच आता स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, 25 मार्चला सुप्रीम कोर्टात राफेल डीलप्रकरणी सुनावणी झाली होती. यावेळी राफेल डीलप्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे दिसत नाही, अशी ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी मूळ याचिकाकर्त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या फाइलमधील ज्या दस्तावेजांचा आधार घेतला, त्यावर केंद्र सरकारने विशेषाधिकाराचा दावा केला होता. याचिकाकर्त्यांनी दस्तावेज अधिकार नसताना मिळवून त्यांचा वापर केला असल्याने न्यायालय त्यांचा विचार करू शकत नाही, असे प्रतिपादनही केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केले होते.