- हरिश गुप्ता नवी दिल्ली : आताच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू लाकसभेची वेळ आली, तर सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला गळाला लावण्याची शक्यता शिल्लक राहावी, असा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्तापासूनच साखरपेरणी करण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळतात. याच उद्देशाने मोदींनी पवार यांच्यावर संयमी टीका केली व खुद्द बारामतीमध्येही स्वत: सभा घेतली नाही, पण मोदी आणि भाजपाच्या या जाळ्यात न अडकण्याची पवार यांची ठाम मनोभूमिका सध्या तरी दिसते.शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन या सुळे यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. स्वत:चा कोणी तगडा उमेदवार न मिळाल्याने कांचन कुल यांना भाजपाने आपले निवडणूक चिन्ह दिले आहे. आधी मोदींची बारामतीत सभा ठरली होेती, पण ऐनवेळी मोदींनी स्वत: सभा न घेण्याचे ठरवून भाजप अध्यक्ष अमित शहांना सभेसाठी पाठविले. बारामतीत येत्या मंगळवारी २३ एप्रिलाला मतदान व्हायचे आहे.मोदींची सभा झाली की, पवारांचा बालेकिल्ला सर करणे सोपे जाईल, या आशेने भाजपचे स्थानिक नेते बारामतीच्या मोदींच्या सभेची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. महाराष्ट्रातील इतर सभांमध्ये मोदी पवार यांच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल सातत्याने हल्ला चढवत असल्याने मोदी बारामतीत येऊनही घणाघाती टीका करतील, असे स्थानिक नेत्यांना वाटत होते. कन्या सुप्रिया सुळे व आता नातू पार्थ पवार या रूपाने पवार घराण्याची चौथी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरली आहे.मोदींनी याआधी महाराष्ट्रात झालेल्या सात सभांमध्ये प्रामुख्याने पवार यांच्यावरच टीका केली होती. याने राष्ट्रवादीचे नेतेही काहीसे चक्रावले होते. पण यामागेही नक्की योजना होती, असे जाणकारांना वाटते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला ९ ते १२ जागा मिळू शकतात, अशी शक्यता मोदींना त्यांच्या खास खबऱ्यांकडूनच मिळाल्यानंत हा बदल झाला. निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर सत्तेसाठी विरोधी पक्षांमधील काहींना गळाला लावावे लागेल. त्यामुळे राष्ट्रवादी मदतीला येण्याची शक्यता पार पुसली न जाण्याची मोदींनी काळजी घेतली. म्हणूनच पवार यांच्यावर व्यक्तिगत टीका केली तरी मोदींना पवार यांच्यावर भ्रष्टाचारावरून तोंडसुख घेतले नाही. लातूरमध्ये काँग्रेससोबत जाण्यातील पवार यांच्या शहाणपणावरही मोदी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. ‘अशा फूटपाडू पक्षांसोबत जाणे पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभते का?’, असे मोदींनी विचारले होते.‘देशात दोन पंतप्रधांनांची भाषा केली जात असताना तुम्ही गप्प कसे बसू शकता? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून तुम्ही परकियांच्या नजरेने भारताकडे पाहू लागले आहात. तुम्हा रात्री झोप तरी कशी येते,’ असा सवाल अहमदनगरच्या सभेत करून पवार यांची एक राष्ट्रभक्त नेता अशी प्रतिमा मांडण्याची काळजी मोदींनी घेतली. उघड आहे की, जेथे घाव घातल्यावर पवार बदलतील तेथेच वार करण्याची काळजी मोदींनी घेतली.पण मोदींच्या या इशाऱ्यांना पवार बधलेले दिसत नाहीत. मोदींनी बारामतीची सभा रद्द केल्यावरही पवार यांनी मोदींवर टीका करणे सोडले नाही. पवार म्हणाले ‘ मोदी पुढे काय करीतल याची मला भीती वाटते. त्यांनी राजकारणाचे धडे माझ्याकडून घेतले असे ते पूर्वी एकदा म्हणाले होते. पण हल्ली हा माणूस काय करेल हे कळेनासे झाल्याने मला भय वाटते.’यंदा पाठिंबा देण्याची शक्यता कमीनिदान यावेळी तरी पवार मोदींच्या गळाला लागण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे सध्या दिसते. सन २०१४ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला स्वत:हून अनाहूत पाठिंबा देऊ करून पवार एकदा मोदींच्या जाळ्यात अडकले होते, पण सूत्रांनुसार पवार यावेळी ‘संपुआ’च्या रथावर घट्ट मांड ठोकून बसले आहेत व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेही त्यांच्याशी फोनवर नियमित संपर्क ठेवून असतात.
मोदींच्या साखरपेरणीने पवार गळास लागतील?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 4:10 AM