गुहागर : गेली अनेक वर्षे मी केंद्रात काम करतोय. सहा टर्म अनंत गीतेंना केंद्रात पाहतोय. एखादा जागरूक प्रतिनिधी केंद्रात असेल मग तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी त्याला सहकार्य करणे माझे काम समजतो. अनंत गीते यांनी खासदार म्हणून कधीही तोंड उघडले नाही. लोकांचे प्रश्न, दु:ख कधी मांडलेले मला आठवत नाही. संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ शृंगारतळी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले की, सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद सदस्यापासून अर्थमंत्रीपर्यंत प्रदीर्घ काळ ग्रामीण पातळीपासून देशपातळीवर काम केले आहे. कोकणाचे नेतृत्व करणारा चांगला माणूस तटकरेंच्या रूपाने मिळाला आहे. ती कुवत तटकरेंमध्ये असल्याने त्यांची उमेदवारी महत्त्वाची आहे.खासदार प्रफुल्ल पटेल केवळ ७ महिने उद्योगमंत्री असताना काही हजार कोटींचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यात आणला त्याचे कामही सुरू झाले. मात्र, सरकार बदलल्यानंतर अनंत गीते यांनी मंत्री म्हणून पुढील काम होऊ दिले नाही. याउलट सुनील तटकरे यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा पदाचा जनतेसाठी उपयोग करून आपला वेगळा ठसा उमटवला.
''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 00:07 IST