नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज(गुरूवार, 22 जुलै) दिल्लीत संसद मार्चची सुरुवात केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर 'शेतकरी संसद'द्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. तर, तिकडे काँग्रेस खासदारांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वात हे कायदे परत घेण्याच्या मागणीसह आंदेलन केले. संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात दोन्ही सभागृहातील काँग्रेस नेत्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी नेत्यांनी ‘काळे कायदे परत घ्या’ आणि ‘पंतप्रधान न्याय करा’ , अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारल आहे. दिल्ली सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर दररोज 200 शेतकरी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर-मंतरवर सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करतील. शेतकऱ्यांच्या आदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जंतर-मंतर संसदेपासून काही अंतरावर असल्यामुळे पोलिस आणि सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)ला एक शपथपत्र देण्यस सांगितले आहे. त्यात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन आंदोल केले जाईल, असे लिखीत असेल. यापूर्वी, 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान राजधानीत मोठा हिंसाचार झाला होता. लाल किल्यात घुसून अनेक आंदोलकांनी पोलिसांनाही मारहाण केली होती.