मुंबई : येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यातच भाजपामध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, अशी माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
'वनविरोधी लोकांना उकळ्या फुटायची गरज नाही'बुधवारी कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. याबाबत जयंत पाटील म्हणाले, "स्टे दिलेला असला तरी अंतिम सुनावणी बाकी आहे. आरेच्या भागात वन क्षेत्र आहे, त्यात वनविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही. मुंबईच्याजवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरण हानी होते, सरकारने भूमिका घेतली त्यावर इतकं आकांततांडव करण्याची गरज नाही. राजकीय हितासाठी काही जण राजकारण करत आहेत."
अनेक आमदार येणार महाविकास आघाडीत, अजित पवारांचा गौप्यस्फोटतीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपाला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही त्यांनी मंगळवारी विधानसभेत म्हटले होते.