मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद आणखी वाढत चालला आहे. कंगनाबद्दल अर्वाच्च शब्दाचा वापर केल्यानं संजय राऊतांवर चहुबाजूने टीका होत होती. कंगनावर टीका करताना संजय राऊतांनी हरामखोर या शब्दाचा वापर केला. त्याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राऊतांनी या शब्दाचा उलगडा करत स्पष्टीकरण दिले.
संजय राऊत म्हणाले की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो असं ते म्हणाले. राऊतांच्या या स्पष्टीकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत असं सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी याआधीही कंगना प्रकरणावरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. कंगनाच्या पोस्टरला शिवसैनिकांनी जोडेमारो आंदोलन केले होते. त्यावर त्यांनी म्हटलं होतं की, आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही असं सांगत त्यांना कंगनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता.
महाराष्ट्र सरकार कंगना विरोधात, केंद्रानं दिलं संरक्षण
मुंबईत असुरक्षित वाटते, अशा आशयाच्या कंगनाच्या वक्तव्यानंतर, कंगनाने मुंबई पोलिसांप्रती अविश्वास दाखवल्यामुळे आणि त्यांची बदनामी केल्यामुळे, तिला येथे राहण्याचा कसलाही अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.