भोपाळ - मध्य प्रदेशातील २८ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील २८ जागांवर ३५५ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत, त्यापैकी २२ महिला उमेदवार आणि १२ मंत्रीही रिंगणात आहेत. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये बहुतांश जागांवर थेट लढत होत आहे, तर काही जागांवर बसपा आणि अपक्षांनी तिरंगी लढत केली आहे. ही पोटनिवडणूक राज्यातील शिवराज सरकारचं भवितव्य ठरवणारी आहे तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सीएम कमलनाथ यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सुमारे ६३ लाख ८८ हजार मतदार २८ जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यात ३३.७२ लाख पुरुष आणि २९.७७ लाख महिला आणि १९८ तृतीय लिंग मतदार आहेत, पोटनिवडणुकीत मतदानासाठी तब्बल ९,३६१ मतदान केंद्रे तयार केली गेली असून त्यापैकी ३,०३८ बूथ 'संवेदनशील' म्हणून घोषित केले आहे. सुरक्षा आणि निष्पक्ष मतदानासाठी ३३ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
केवळ मध्य प्रदेशच नाही तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राज्यात २८ जागांवर एकाच वेळी पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. मध्य प्रदेशात २९ विधानसभा जागा रिक्त आहेत, त्यापैकी २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. कॉंग्रेसच्या २५ आमदारांचा राजीनामा आणि ३ आमदारांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. भाजपाने कॉंग्रेसमधून आलेल्या सर्व २५ आमदारांना तिकीट दिलं आहे. त्यापैकी १४ शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत.
मध्यप्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागा असून त्यापैकी २९ जागा रिक्त आहेत. यापैकी २८ जागांवर निवडणुका होत आहेत, त्यानुसार २२९ जागांच्या आधारे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११५ आमदारांची गरज आहे. अशा परिस्थितीत भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी केवळ आठ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे, तर कॉंग्रेसला सर्व २८ जागा जिंकणं आवश्यक आहे. भाजपाकडे सध्या १०७ आमदार आहेत, तर कॉंग्रेसकडे ८७ आमदार, चार अपक्ष, दोन बसपा आणि एक सपा असं पक्षीय संख्याबळ आहे.
२८ जागांवर पोटनिवडणुका
मध्य प्रदेशात २८ जागांवर पोटनिवडणूक होत असून त्यापैकी १६ जागा ग्वाल्हेर-चंबळ भागात आहेत. यामध्ये मुरैना, मेहगाव, ग्वालियर पूर्व, ग्वाल्हेर, डबरा, बामोरी, अशोक नगर, अंबा, पोहरी, भांडेर, सुमावली, कारेरा, मुंगावली, गोहड, दिमानी आणि जौरा या जागांचा समावेश आहे. त्याच वेळी मालवा-निमार भागात सुवासरा, मांधाता, सान्वरस अगर, बडनावार, हातपीपल्या आणि नेपानगर जागा आहेत. या व्यतिरिक्त सांची, मल्हारा, अनुपपूर, बियौरा आणि सुर्खी जागा आहेत. त्यापैकी जौरा, अगर आणि बियौरा जागांवरील ३ आमदारांच्या मृत्यूमुळे पोटनिवडणुका होत आहेत.
शिवराजांच्या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत १४ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातील ११ कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये गेल्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे, कारण हे सगळे शिंदे समर्थक मानले जातात आणि प्रत्येकाने केवळ ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सांगण्यावरुनच पक्ष बदलला. यामध्ये तुळशी सिलवत, गोविंदसिंग राजपूत, प्रभु राम चौधरी, इम्रती देवी, प्रद्युम्नसिंग तोमर, महेंद्रसिंग सिसोदिया, गिरराज दंडोतिया, ओपीएस भादोरिया, सुरेश धाकड, ब्रिजेंद्रसिंग यादव, राज्यवर्धनसिंग दत्तीगांव, एडलसिंग कंसाना, बिसाउलाल सिंह आणि हरदीपसिंग डंग यांचा समावेश आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर आव्हान
ज्योतिरादित्य शिंदेंसाठी हे गणित थोडे वेगळे आहे. ज्योतिरादित्य शिंदे गटाचे २२ आमदार ज्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन निवडणूक लढवत आहेत, त्यांचे निवडून येणं गरजेचे आहे. शिंदेसाठी ही पोटनिवडणूक आपल्या क्षेत्रातील त्यांचे राजकीय स्थान पुन्हा सिद्ध करण्याची संधी आहे. कारण २२ पैकी १६ जागा ग्वालीर आणि चंबळ भागातील आहेत, जिथे शिंदे कुटुंबाचे वर्चस्व आहे. शिंदे यांना आपल्या नवीन पक्षासमोर (भाजपा) समोर स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. यात त्यांना आव्हान फक्त कॉंग्रेसचे नाही, तर बसपा देखील या पोटनिवडणुकीत प्रत्येक जागा लढवत आहे.
महिला उमेदवार मैदान
मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण २२ महिला उमेदवार रिंगणात आहेत, परंतु ३ महिला उमेदवार भाजपा आणि तीन कॉंग्रेसच्या आहेत. भाजपाच्या तिकिटावर डाब्रा येथील इम्रती देवी, नेपानगर येथील सुमित्रा देवी आणि भांडेर येथून रक्षा सिरोनिया आपले नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर सुर्खी येथील पारुल साहू, मल्हारा येथील रामसिया भारती आणि अशोक नगर येथील आशा दोहरे या काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात आहेत. याशिवाय इतर पक्ष आणि अपक्षांच्या उर्वरित महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. भाजपामधील महिला उमेदवार २०१८ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी होऊन विधानसभेत पोहोचल्या होत्या.
6 जागांवर करावा लागणार संघर्ष
पोटनिवडणूक होत असलेल्या मध्य प्रदेशातील २८ जागांपैकी अर्धा डझन जागा आहेत, जिथे २०१८ च्या निवडणुकीत विजय आणि पराभवात खूप कमी फरक आहे. यातील तुळशीराम सिलावट यांनी २९४५ मतांच्या फरकाने सांवेरच्या जागेवर जिंकले होते. मुनगौली २१३६ मतांनी विजयी, कृष्णा पाल यांनी कडवी झुंज दिली होती. मांडवाचे आमदार नारायण पटेल हे खंडवा ब्लॉकमधील कॉंग्रेसचे एकमेव आमदार होते. त्यांनी भाजपाचे नरेंद्रसिंह तोमर यांना केवळ १,२३६ मतांच्या फरकाने पराभूत केले होते.