भोपाळ – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच मध्य प्रदेशातील २८ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत, या पोटनिवडणुकीत भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी ८ जागांची गरज आहे. या निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १३ जागांवर तर काँग्रेस ७ आणि बसपा १ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
२८ जागांसाठी ३५५ उमेदवार उभे होते, विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार सुरक्षित असल्याचं चित्र होतं, मात्र या निवडणुकीत काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऐन कोरोना काळात काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला, याठिकाणी ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचं कमलनाथ सरकार कोसळलं, राजीनामा दिलेल्या आमदारांच्या जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यात प्रामुख्याने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना भाजपाने तिकीट दिले होते, त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदेनी कंबर कसली होती.
काँग्रेसच्या २५ आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या २५ आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी १४ जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला केवळ ८ जागा हव्या आहेत. तर काँग्रेसला २८ पैकी २८ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सर्व जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता फार कमी आहे. निकालाच्या कलांमध्ये १३ जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर ७ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
ज्योतिरादित्य शिंदेंसाठी हे गणित थोडे वेगळे आहे. ज्योतिरादित्य शिंदे गटाचे २२ आमदार ज्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन निवडणूक लढवत आहेत, त्यांचे निवडून येणं गरजेचे आहे. शिंदेसाठी ही पोटनिवडणूक आपल्या क्षेत्रातील त्यांचे राजकीय स्थान पुन्हा सिद्ध करण्याची संधी आहे. कारण २२ पैकी १६ जागा ग्वालीर आणि चंबळ भागातील आहेत, जिथे शिंदे कुटुंबाचे वर्चस्व आहे. शिंदे यांना आपल्या नवीन पक्षासमोर (भाजपा) समोर स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. यात त्यांना आव्हान फक्त कॉंग्रेसचे नाही, तर बसपा देखील या पोटनिवडणुकीत प्रत्येक जागा लढवत आहे.