भोपाळ – मध्य प्रदेशात शिवराज सरकार लव जिहादवर कायदा बनवण्यासाठी विधेयक आणणार आहे. या विधेयकानुसार फसवणूक करून लग्न केल्यास ५ वर्षाची जेलची हवा खावी लागणार आहे. लव जिहाद प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येईल आणि लव जिहाद सिद्ध झाल्यास लग्न रद्दही होणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
याबाबत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मध्य प्रदेशात धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२० आणण्याची तयारी सुरु आहे. लवकरच हे विधेयक विधानसभेत आणलं जाईल. यात प्रलोभन, फसवणूक आणि बळजबरीने लग्न केल्यास दोषींवर ५ वर्षांची कठोर कारवाई होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्यातील दोषींना जामीन मिळणार नाही.
तसेच हा गुन्हा करणाऱ्या माणसाला मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अशाच प्रकारे शिक्षा होणार आहे. या प्रकरणात तक्रार करणे गरजेचे आहे. लग्नासाठी धर्मांतर केलेल्या जोडप्यांनी एक महिन्याच्या आत स्थानिक जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे माहिती देणं आवश्यक आहे. हे विधेयक पुढच्या अधिवेशनात मांडले जाईल असं गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत लव जिहादविरोधात कायदा आणण्याबाबत चर्चा केली होती. मुख्यमंत्री म्हणाले होते की, लव जिहाद आणि लग्नासाठी बळजबरीने धर्म परिवर्तन करणं हे यापुढे राज्यात चालणार नाही. हे पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशी आहे. याच्याविरोधात कायदा बनवला जाईल.
दरम्यान, मध्य प्रदेश सरकार या पावलावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूब यांनी भाष्य केले आहे. जीशान यांनी ट्विट करून म्हटलंय की, प्रेम केल्यावर जेल जावं लागणार आहे किंवा प्रेम करण्यापूर्वी पहिल्यांदा धर्म पाहावा लागेल, घाबरू नका, द्वेष पसरवला तर कोणीही अडवणार नाही मात्र टाळ्या वाजवतील आणि वाजवल्या जातील. लव जिहादसारख्या खोट्या प्रकरणावर कायदा बनवला जात आहे, वाह साहेब अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे.