ग्वाल्हेर – महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नावाने ज्ञानशाळा उघडण्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे गोडसे ज्ञानशाळेचं उद्धाटन करण्यात आलं आहे. या ज्ञानशाळेत गोडसे यांची विचारधारा युवकांना शिकवण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत मध्य प्रदेशातील शिवराज सरकारनेही या कार्यक्रमावर कोणतीही कारवाई केली नाही.
गोडसे ज्ञानशाळेत नथुराम गोडसे यांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. तसेच उद्धाटनावेळी उपस्थित पाहुण्यांनी नथुराम गोडसेच्या देशभक्तीबद्दलचे किस्से लोकांना सांगितले. नथुराम गोडसे हिंदू महासभेचे जोडले गेले होते, कार्यक्रमात नथुराम गोडसे यांच्यासोबत अनेक महापुरुषांचे फोटोदेखील जोडण्यात आले, ग्वाल्हेरच्या दौलतगंज परिसरात हिंदू महासभेच्या कार्यालयात ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.
हिंदू महासभेने नथुराम गोडसेसोबत महाराणा प्रताप, महाराणी लक्ष्मीबाई, गुरू गोबिंद सिंह आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमाही लावल्या होत्या. मध्य प्रदेश आणि नथुराम गोडसे वादाचं सत्र अनेक वर्षापासून सुरू आहे, हिंदू महासभा ग्वाल्हेरमध्ये दरवर्षी नथुराम गोडसे जयंती साजरी करते, दोन वर्षापूर्वी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी गोडसेला देशभक्त बोलल्याने वाद झाला होता, त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना संसदेत माफी मागावी लागली होती.
यावेळी हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी विधान केले की, या देशाचे कुणीही विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू महासभा त्याला प्रखरतेने विरोध करेल, ठोस उत्तर देईल, इतकचं नाही तर हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडसे निर्माण करण्यात येईल असा इशारा दिला.
३० जानेवारीला महात्मा गांधींची हत्या केली होती.
नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी दिल्लीतील बिडला हाऊस येथे महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती, त्यावेळी महात्मा गांधी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते, गोडसे त्यांच्या जवळ आला आणि जवळून महात्मा गांधींवर ३ गोळ्या झाडल्या. त्यात जागीच महात्मा गांधींचा मृत्यू झाला. त्यानंतर १५ नोव्हेंबर १९४९ रोजी नथुराम गोडसेला अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.