By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:54 PM
mp navneet rana writes to lok sabha speaker alleging shiv sena mp arvind sena threatened her:
नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या, पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा घटनांच्या मालिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. आता यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. (mp navneet rana writes to lok sabha speaker alleging shiv sena mp arvind sena threatened her)नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत भाषण करताना ठाकरे सरकारवर सवाल उपस्थित केले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप राणा यांनी केला आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेले परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा संसदेत गाजला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सिंग यांनी पत्रात केला होता. त्यावरून भाजपच्या खासदारांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधलं. अपक्ष खासदार नवनीत राणांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच खंडणी वसुली होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.ठाकरे सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा दावा राणा यांनी केला. सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी राणा यांना धमकी का देईन? मी त्यांना धमकी दिली की नाही, हे तिथे उपस्थित असलेले लोकदेखील सांगू शकतील. राणा यांची देहबोली आणि त्यांचे शब्द चुकीचे होते, असं सावंत म्हणाले. त्यावर मी कसं आणि काय बोलायचं हे ते मला सांगणार का, असा सवाल राणा यांनी विचारला.