पंढरपूर – शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे आमनेसामने आले आहेत, रायगड किल्ल्यावर डिस्को लायटिंग करण्यात आल्याने संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली होती, त्याबाबत त्यांनी ट्विटरवरून भारतीय पुरातत्व विभागाला धारेवर धरले होते, परंतु ही लायटिंग खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून झाल्याने त्यावरून वादंग निर्माण झाला होता. (Chhatrapati Sambhajiraje Target Shivsena MP Dr Shrikant Shinde over Controversy on Raigad Fort Lighting)
संभाजीराजेंच्या नाराजीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती, त्यावरून खासदार संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, रायगडावर पुरातत्व खात्याच्या सूचनेने चुकीच्या पद्धतीने विद्युत रोषणाई केली आहे. माझा पुरातत्व खात्यावर आक्षेप होता. यामुळे काळा दिवस हा शब्द पुरातत्व खात्यासाठी उद्देशून बोललो होतो. मी पुरातत्व खात्याला धारेवर धरले. परंतू खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीचा अर्थ घेऊन माझ्यावर टीका केली आहे. मला राजकीय टॅग लावलेले चालणार नाही असं त्यांनी बजावलं.
तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती बद्दल कोणी मला शिकवू नये. मला किल्ले रायगड वरून राजकीय बोट दाखवले तर सहन होणार नाही. माझ्यावर कोणी राजकीय टीका केली तर गाठ माझ्याशी आहे. परंतु सामान्य नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण दिलं असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?
संभाजीराजेंनी रायगडावर केलेल्या डिस्को लायटिंगवरून ही अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे, भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल अशी टीका केली होती, त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह दिसणार, राजसदर काळोखात होती, महाराज काळोखात होते, त्यासाठी विद्युत रोषणाई करण्याचा माझा प्रामाणिक हेतू होता, परंतु रोषणाई राजकीय असू शकते हे मला आज कळालं असं त्यांनी म्हटलं होतं, त्यावर संभाजीराजेंनी स्पष्टीकरण दिलं.
काय आहे वाद?
शिवसेनेचे कल्याण येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे(Shivsena Dr. Shrikant Shinde) यांनी पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन रायगडावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई केली होती, मात्र त्यावरून आता वाद झाला, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं की, भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही(Ajit Pawar) या प्रकरणावरून फटकारलं होतं, अजित पवार म्हणाले होते की, काही उत्साही लोकांनी रायगडावर लायटिंग केली हा त्यांचा अजाणतेपणा असल्याचं दिसून येतो, पण महाराजांचा वारसा आहे तिथे असं घडणं चुकीचं आहे, काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात, या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य जपलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डिजे लाईट लावणं अतिशय गंभीर आहे असं त्यांनी सांगितले होते.