कोलकाता - ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे माजी सहकारी मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केल्यानंतर आता राज्यातील राजकीय खेळ पुन्हा रंगू लागला आहे. टीएमसी सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी मुकुल रॉय यांनी संपर्क साधणे सुरू केले आहे. या नेत्यांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचसोबत भाजपाचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनाही आपल्या तंबूत ओढण्याचे काम टीएमसीने सुरू केले आहे. सूत्रांनुसार आतापर्यंत 25 जणांची प्राथमिक यादी बनवण्यात आली आहे, तर 100 पेक्षा अधिक भाजपा नेते असे आहेत जे त्यांच्या परिसरात वर्चस्व राखून आहेत.
मुकुल रॉय यांच्या भरवशावर त्यांनी टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला होता. या नेत्यांना टीएमसीत पुन्हा घेण्याची रणनीती आखली जात आहे. याच दरम्यान आता तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले सुनिल मंडल (Sunil Mandal) यांनी पक्षाविरोधात आवाज उठवला आहे. भाजपाच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या लोकांवर पक्षाचा विश्वास नसल्याचा गंभीर दावा सुनिल मंडल यांनी केला आहे. तसेच मंडल यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "सुवेंदू अधिकारी यांनी मला दिलेलं एकही वचन पाळलेलं नाही" असं ही म्हटलं आहे.
सुनिल मंडल यांनी भाजपामध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याची देखील तक्रार केली. "तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना इथे अस्वस्थ वाटत आहे. त्यांचा भाजपामध्ये मनापासून स्वीकार केला गेलेला नाही. भाजपामधल्या काही लोकांना असं वाटतं की पक्षात नव्याने आलेल्या लोकांवर विश्वास ठेवणं योग्य नाही" असं मंडल यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्येभाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत असल्याची घटना समोर आली आहे.
"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण
बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भाजपाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भाजपाचे 300 कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले आहेत.