MPSC Exam Postponed: “अधिवेशन, लग्न समारंभ होतात मग MPSC परीक्षा का नाही?”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:50 PM2021-03-11T16:50:02+5:302021-03-11T16:52:12+5:30
Congress Leader Prithviraj Chavan Oppose Thackeray government decision of MPSC Exam Postponed: MPSC परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही, कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे योग्य नाही
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, परंतु आता या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अधिवेशन, लग्न समारंभ, आरोग्य विभागाच्या भरती होतात मग MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Congress Prithviraj Chavan) यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे MPSC परीक्षांचा निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेण्यात आलं होतं की नव्हतं असा प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, MPSC परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही, कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे योग्य नाही, विद्यार्थींनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा? ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत, कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घ्यायला हव्यात असं त्यांनी सांगितले, टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय अन् सरकारमध्ये मतभेद
MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होत्या, परंतु राज्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हजारो विद्यार्थी संतप्त झाले, त्यांनी पुण्यातील रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला, काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.
पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा
याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करून म्हटलंय की, एमपीएससीची परीक्षा(MPSC Exam) अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे असं त्यांनी सांगितले आहे.
सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल
सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे, तसेच जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोवर रस्त्यावरून बाजूला हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.