मुंबई: हॉटस्टार या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मुघल बादशाहंच्या आयु्ष्यावर एक वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजबद्दल बोलताना चित्रपट दिग्दर्शक कबीर खाननं मुघल बादशाहंच कौतुक केलं होते. तसेच, या देशाचे खरे राष्ट्र निर्माते मुघल असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनइंस्टॉल हॉटस्टार आणि कबीर खान तालिबानी अशी टीका करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातवर आता भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात राम कदम म्हणतात की, 'द एम्पायर नावाची वेब सीरीज हॉटस्टारवर येत आहे. ज्या मुघल बादशाहांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. रक्तपात करत लूटमार केली, लोकांवर अनन्वित अत्याचार करत छळ केले. मंदिरं तोडली, धर्मशाळांचा विद्ध्वंस केला, त्या मुघलांचा जयजयकार आणि प्रशंसा या वेब सीरीजमध्ये केली आहे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत जे मुघल बादशाह भारतात येऊन लूट करतात, त्यांचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं? आमचा या वेब सीरीजला विरोध आहे. याच्यावर कायमची बंदी घालायला हवी, अशी मागणी राम कदमांनी ट्विटरवरुन केली आहे.
कबीर खाननं वक्तव्य मागे घ्यावंराम कदम पुढे म्हणाले की, एकीकडे मुघलांचा जयजयकार करणारी वेब सीरिज येत आहे आणि दुसरीकडं दिग्दर्शक कबीर खान म्हणतात की, या आक्रमणकारी मुघल बादशाहांचा भारताच्या निर्मितीत, देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी भारतात लूट केली, त्यांचा भारताच्या निर्मितीत वाटा? हे विधान न पटणारं आहे. कोणाला चित्रपट-मालिका बनवायची असेल, तर आमच्या शिवरायांवर बनवा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापसिंग यांच्यावर बनवा. पण अशा प्रकारचं विधान आम्हाला मान्य नाही. अत्याचारी मुघल बादशाहाबद्दल कौतुकानं केलेलं विधान त्वरित मागं घ्यावं, असं राम कदम यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हणाले.
काय म्हणाला होता कबीर खान ?'मुघलांची राक्षसी प्रतिमा दाखवणं मला खूपच प्रॉब्लेमॅटिक आणि क्लेशदायी वाटतं. मला खरोखर कुठली गोष्ट अस्वस्थ करत असेल, तर ती म्हणजे केवळ लोकप्रिय कथानकानुसार तशा प्रकारची सिने निर्मिती केली जाणं. जेव्हा एखाद्या चित्रपट निर्मात्यानं कुठल्या गोष्टीवर संशोधन केलं असतं आणि चित्रपट निर्मात्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो, तेव्हा मी समजू शकतो. नक्कीच, वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. पण जर तुम्हाला मुघलांना राक्षसी स्वरुपात दाखवायचं असेल, तर कृपया ते संशोधनावर आधारित दाखवा आणि तुम्हाला ते खलनायक का वाटले, हे आम्हाला समजावून सांगा.'
'जेव्हा तुम्ही थोडंफार संशोधन केलं असतं आणि इतिहास वाचला असतो, तेव्हा मुघलांना खलनायक का ठरवलं गेलं, हे समजणं खूप कठीण जातं. मला तर वाटतं की ते मूळ राष्ट्रनिर्माते होते, पण त्या मुद्द्याला बगल देण्यासाठी त्यांनी लोकांचे खून केले, असं म्हटलं गेलं. पण तुम्ही कशाचा आधार घेत आहात? कृपया ऐतिहासिक पुरावे द्या. फक्त तुम्हाला लोकप्रिय वाटेल अशा कथेसोबत जाऊ नका,' असंही कबीर खान म्हणाले.