मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. लोकसभेच्या मैदानात मनसेचा एकही उमेदवार न उतरवताही आक्रमक भाषणशैली आणि भाजपाने भूतकाळात केलेल्या दाव्यांची पुराव्यानिशी चिरफाड करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला जेरीस आणले आहे. राज ठाकरे यांनी केलेले आरोप फेटाळून लावत असताना भाजपाच्या नेत्यांची दमछाक होत आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. 'ए लाव रे तो व्हिडीओ'वाल्या राज यांनी या व्हिडीओचा धागा पकडत, देशातील बदललेल्या हवेचा अंदाज घेत मुकेश अंबानी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा दावा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून केला.
राज यांच्या या दाव्यानंतर, मुकेश अंबानी यांनी खरोखरच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे का?, देशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मुकेश अंबानी यांनी त्यांचे निकटवर्तीय असलेल्या नरेंद्रभाई मोदींपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे का? राज ठाकरेंनी अंबानींच्या पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत.कॉम'ने लोकमतच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधला. त्यातून पुढे आलेली मतं तुम्हाला तुमचं मत ठरवायला मदत करू शकतात.
मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना दिलेल्या पाठिंब्यावरून राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत 'लोकमत' समूहाचे सल्लागार संपादक दिनकर रायकर म्हणाले की, ''अंबानी यांनी मिलिंद देवरांना पाठिंबा दिला आहे याचा अर्थ काँग्रेसला दिला आहे असा काढणं चुकीचा आहे. अंबानी-देवरा कुटुंबाची अनेक वर्षांची मैत्री आहे. १९८०च्या निवडणुकीत मुरली देवरा काँग्रेसकडून लढले होते, तेव्हा धीरूभाई अंबानी हे त्यांचे इलेक्शन एजंट होते. त्यातून त्यांचं घट्ट नातं दिसून येईल. या मैत्रीचा भाग म्हणूनच मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. त्याचा अर्थ अंबानींनी मोदी सरकारविरोधात भूमिका घेतली असा होत नाही. मात्र त्याचवेळी, देशातील काही औद्योगिक घराणी मोदी सरकारवर नाराज आहेत. अंबानींची भूमिका हा त्याचाही एक भाग असू शकतो.''
मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत राज ठाकरे यांनी सोईस्कर भूमिका मांडल्याचं 'लोकमत'चे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी सांगितले. ''मुकेश अंबानी आणि मिलिंद देवरा, धीरूभाई अंबानी आणि मुरली देवरा (मिलिंदचे वडील) यांचे वर्षानुवर्षे असलेले कौटुंबिक ऋणानुबंध सर्वश्रुत आहेत. एका विशिष्ट जागेसाठी दिलेल्या पाठिंब्यावरून देशाचे अनुमान काढता येत नाही.''
लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनीही मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना दिलेल्या जाहीर पाठिंव्यामागे देवरा आणि अंबानी कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासूनचे घनिष्ट संबंध, हेच कारण असल्याचे मत मांडले. ''मुरली देवरा आणि धीरूभाई यांच्या मैत्रिपूर्ण संबंधांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असे. या नात्यानेच मुकेश यांनी मिलिंद यांना पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी, सध्याच्या घडीला देवरा यांच्या विकासाभिमुख भूमिकेला पाठिंबा देण्याची हिंमत दाखवणारे मुकेश अंबानी हे एकमेव मोठे उद्योगपती आहेत,'' असेही नायक यांनी अधोरेखित केले.
मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना दिलेल्या पाठिंब्यामागे राजकारण नाही, असे मत लोकमतचे निवास संपादक गजानन जानभोर यांनी मांडले आहे. ''धीरूभाई आणि मुरली देवरा यांनी त्यांच्या संघर्षाची कारकीर्द एकाच वेळी सुरू केली. असं सांगतात की, धीरूभाई अंबानी आणि मुरली देवरा सुरुवातीच्या काळात एकाच कपातील चहा दोघे मिळून प्यायचे. धीरूभाईंच्या सुरुवातीच्या काळात देवरा यांनी त्यांना खूप मदत केली. देवरा पेट्रोलियम मंत्री असताना अंबानी कुटुंबीयांशी त्यांचे असलेले संबंध हा अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय झाला होता. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा धीरूभाईंसोबत राजीव गांधींची मैत्री करण्यात मुरली देवरा यांचा महत्त्वाचा वाटा होता. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसची धुरा स्वीकारल्यानंतर गांधी परिवार आणि अंबानी परिवार यांच्यातील मुरली देवरा हे दुवा होते. मुरली देवरा जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हाही अंबानी कुटुंबीयांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा दावा केवळ बालिशपणाचा नाही तर ठाकरे यांची राजकारणातील अपरिपक्वता दाखविणाराही आहे.''
''मिलिंद देवरा यांना अंबानी, कोटक आदी उद्योगपतींनी पाठिंबा देणे हा म्हटले तर त्यांच्यातील व्यक्तिगत स्नेह, संबंधाचा भाग आहे. विशेष इतकेच की, या उद्योगपतींनी हे असे प्रथमच उघडपणे केले. का, तर सरकार कोणतेही, कुणाचेही असो, पण काही आपली माणसं संसदेत असणं त्यांना गरजेचं वाटू लागलं असावं. अन्यथा पडद्यामागे आर्थिक पाठबळ पुरवून ते नामानिराळे राहू शकले असते. यात नाही म्हटले तरी सत्ताधारी विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देण्यातून संकेत नक्कीच घेता यावा, पण तसा तो देण्याची अंबानींची स्वतःची मानसिकता असेल का हे शंकास्पद आहे. कारण संकेत घेणे आणि देणे या दोन्ही प्रत्येकाच्या आकलनानुसार बदलणाऱ्या भिन्न बाबी आहेत,'' याकडे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी लक्ष वेधले.
मुकेश अंबानींचा काँग्रेसला पाठिंबा हा राज ठाकरेंचा दावा ट्विस्ट करणारा असला तरी यावेळी भाजपाला मुकेश अंबानी यांचे मत मिळणार नाही, ही बाब लक्षणीय असल्याचे 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी म्हटले आहे.
तर सध्या सुरू असलेल्या राज ठाकरेंच्या सभांनी मनसेला विधानसभेसाठी मैदान तयार करण्याचे काम केले आहे, याकडे 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ११ उमेदवार उभे केले होते पण त्यात आलेले अपयश हे विधानसभेसाठी त्यांना महागात पडले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एक आमदार निवडून आला आणि आता तो ही शिवसेनेत गेला, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत त्यांना कोणत्याही परिस्थितीत यश मिळवावे लागेल, त्या दृष्टीने त्यांनी स्वतःला प्रभावी विरोधक म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांनी नमूद केलं.