नवी दिल्ली – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या संपूर्ण प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे, परंतु या प्रकरणात सचिन वाझे यांच्याभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत, यातच सचिन वाझे यांच्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. सचिन वाझेंमागे असणारे बडे नेते कोण हे शोधणं गरजेचे आहे, गुन्हेगार भेटला असेल तर हेतू काय तेदेखील तपास यंत्रणा लवकरच समोर येईल असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.(BJP Devendra Fadnavis Allegation on Shivsena & Uddhav Thackeray over Sachin Vaze Case)
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये निलंबित एपीआय सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, शिवसेनेचे दोन मंत्रीही भेटले होते, परंतु या प्रकरणात मी वाझेंची फाईल तपासली, त्यानंतर त्यावेळी अँडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला, तेव्हा वाझेंना घेणं योग्य राहणार नाही, कारण हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु होती असं मला सांगण्यात आला, हा सल्ला लेखी नव्हता तर तोंडी होता, म्हणून मी त्यांना पोलीस दलात पुन्हा घेतलं नाही असा दावा फडणवीसांनी केला आहे.
त्याचसोबत सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, ते शिवसैनिक म्हणून काम करत होते, काही शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचे व्यवसायिक संबंध आहेत, राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आल्यानंतर कोरोना काळात आढावा कमिटीचा अहवाल बनवण्यात आला, यात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं. सचिन वाझे यांना सोडून कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारनं पोलीस सेवेत पुन्हा रुजू केलं नव्हतं असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
सचिन वाझेंवर २०१७ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, वसईत जे रॅकेट सापडलं त्यात सचिन वाझेंचे नाव रेकॉर्ड आलं होतं, इतका खराब रेकॉर्ड असताना त्यांना पोलीस सेवेत घेतलं,त्यानंतर क्राईम युनिटचं हेड बनवलं, क्राईम युनिटचं हेड पीआय दर्जाचे अधिकारी करतात परंतु सचिन वाझे एपीआय असताना क्राईम युनिटचं हेड बनवलं.
मुंबई पोलीस आयुक्तांनंतर कोणाला महत्त्वाचा दर्जा असेल तर तो सचिन वाझेंना होता, मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग करतानाही ते दिसत होते, गृहमंत्र्यांसोबत ते दिसत होते, अनेक शिवसेना मंत्र्यांसोबत ते दिसत होते, सीआययूचे प्रमुख नव्हे तर वसुली अधिकारी म्हणून सचिन वाझेंना बसवलं का? असा प्रश्न पडतो.
मनसुख हिरेन यांना सचिन वाझे पूर्वीपासून ओळखत होतं, हिरेन यांच्याकडून सचिन वाझेंनी स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली परंतु पैसे दिले नव्हते, ४ महिने ही गाडी वाझेंकडे होती, ज्यादिवशी ही गाडी मुलुंडमध्ये पार्क केली होती. त्यानंतर त्याची चावी आणून सचिन वाझेंना दिली होती, त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्यास सांगितलं.
कुर्ला पोलीस स्टेशनला मनसुख हिरेन गेल्यानंतर त्यांची तक्रार घेतली नाही, त्यानंतर सचिन वाझेंनी तेथील पोलिसांना फोन करून तक्रार घेण्यास सांगितले, मनसुख हिरेन यांची चौकशी सचिन वाझेंच करत होते, तेव्हा वाझेंनी हिरेन यांना सांगितले की, तुम्ही तक्रार द्या, विविध अधिकारी मला त्रास देत आहेत, त्यात माझंही नाव द्या असं सल्ला देण्यात आला.
तो ‘अर्धा’ तास बिघडला, हायटाईडच्या ऐवजी लो टाईड असल्याने मनसुख हिरेन यांचा मृतदेह बाहेर आला अन्यथा २ महिने मनसुख हिरेन पोलिसांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाले असं सांगण्यात येणार होते, परंतु मृतदेह बाहेर आल्याने हे सगळं बाहेर आलं, जर हिरेन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असता तर त्यांच्या लंग्समध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असायला हवं होतं.
मनसुख हिरेन हे प्रकरण एटीएसकडे आहे, परंतु हा तपास योग्यरित्या होत नाही, इतके पुरावे माझ्यासारख्या बाहेरील व्यक्तींना मिळत असतील तर पोलिसांना याहून अधिका पुरावे मिळतील, NIA आणि ATS मध्ये अनेक टेप्स आहेत, ज्यात वाझेंनी त्यांना काय काय सांगितलं याचं रेकॉर्डिंग आहे, पुरावे असूनही ATS तपास करत नाही, मनसुख हिरेन हे प्रकरण ATS कडे आहे, आणि मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण NIA कडे आहे, त्यामुळे दोन्ही कनेक्शन एकत्र असल्याने NIA ने या प्रकरणाचा तपास करावा
या प्रकरणात फक्त सचिन वाझे एकटे नाहीत, तर अनेक जण यात सहभागी आहेत, हे मुंबई पोलिसांचे अपयश नाही तर महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे, सचिन वाझेंचा इतिहास चांगला नसताना त्यांना इतक्या महत्त्वाच्या पदावर बसवलं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंचा बचाव करताना दिसत होते, या प्रकरणाच्या खोलाशी जाणं गरजेचे आहे, ज्यासाठी सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत घेतलं त्या उद्देशाचाही तपास होणं गरजेचं आहे.