मुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:39 PM2021-01-28T12:39:25+5:302021-01-28T13:11:25+5:30
बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
"मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार", असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान त्यांच्या जनतेला खूश करण्यासाठी केलं असावं, कर्नाटकचा मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विधानाला कशाचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले.
"महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला", असं अजित पवार म्हणाले.
असे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. "असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा", असा टोला संजय राऊत यांनी लक्ष्मण सवदी यांना लगावला. यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत हे कर्नाटकने लक्षात ठेवावं, असा थेट इशाराही राऊत यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाकडे आमचं लक्ष
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वच राज्यांचं लक्ष असतं. त्यामुळे राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझंही अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वंचित आणि गरीब वर्गाला दिलासा मिळायला हवा, अशी आशा आम्हाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे डोळे अर्थसंकल्पाकडे लागलेले असतात. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसलेला असला ही वस्तुस्थिती जरी असली तरी देशाच्या जनतेवर जास्तीचं ओझं देऊनही चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले.