मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांसाठी बंद झालेले लोकलचे दरवाजे आता १५ ऑगस्टपासून उघडणार आहेत. कोरोनाविरोधातील लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलप्रवासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर प्रतिक्रिया देताना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे.
रावसाहेब दानवे या निर्यणा१५ ऑगस्टपासून रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. लोकलच्या कशा प्रकारच्या फेऱ्या सुरू करायच्या, असा निर्णय घेतला असता तर ते प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोईचं असतं. रेल्वेच्या प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा क्यूआर कोड स्मार्टफोनवर मिळणार आहे. मात्र हा क्युआर कोड तपासण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. त्यासाठी राज्य सरकराने यंत्रणा उभी करावी. मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले.