मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर आता १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज्यातील १०० नगरपालिका आणि पाच महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले तर चांगले यश मिळू शकते याचा अंदाज तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आला असून सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याने महापालिका, नगरपालिकांची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे मानले जाते. पाच महापालिकांमध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पाचही महापालिकांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. जवळपास १०० नगरपालिका/नगरपंचायतींचा एक तर कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आहे. सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे व ती कायम राहील. त्या निर्णयाशी आयोगाचा काहीही संबंध नाही १५ जानेवारीला १४ हजार २३२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. विभागाने असा निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत म्हटले होते. मात्र, जाणकारांच्या मते हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार ग्रामविकास विभागाला आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर सोडतीचा ग्रामविकास विभागाचा निर्णय कायम राहील.
महाविकास आघाडीचं पुढचं टार्गेट निश्चित; भाजपला धक्का देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:33 AM