गुवाहाटी: दोन दिवसांच्या असाम दौऱ्यावर आलेले राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता मुस्लिमांची लोकसंख्या आणि पाकिस्तानवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतात 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली. भारतात बंगाल, असाम आणि सिंधला पाकिस्तान बनवण्याची योजना होती. पण, ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही आणि विभाजन होऊ फक्त पाकिस्तान तयार झाला, असं भागवत म्हणाले.
मोहन भागवतांनी गुवाहाटीमध्ये असामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत NRC-CAA वर लिहीलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशन केलं. यावेळी त्यांनी CAA-NRC बाबत मुस्लिमांच्या मनात असलेली शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, NRC-CAA मुळे हिंदू-मुस्लिम विभाजन होईल, असे दाखवण्यात आले. हा एक राजकीय फायद्यासाठी रचलेला कट आहे.
CAA मुळे मुस्लिमांना धोका नाहीभागवत पुढे म्हणाले की, भारतात अल्पसंख्यांवर विशेष लक्ष्य ठेवले जाईल, असे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणाले होते. तेव्हापासून आतापर्यंत अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जात आहे. CAA मुळे कुठल्याच मुस्लिमाचे नुकसान होणार नाही. हा कायदा शेजारील देशातील पीडित अल्पसंख्यांकासाठी आणला आहे. दरम्यान, यापूर्वी 4 जुलै रोजी भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सर्व भारतीयांचा DNA एकच असल्याचे म्हटले होते.