नवी दिल्ली - राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी ही खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे. गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याची जोरदार टीका केली आहे. "लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरुवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांमध्ये खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे. राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हे कमालीचे नाराज झाले होते. गदारोळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी नायडू यांनी त्यांच्या निवासस्थानी उपसभापती हरिवंश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह उच्च पातळीवरील बैठक घेतली होती.
12 विरोधी पक्षांचा उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव
राज्यसभेत रविवारी झालेल्या कामकाजावर प्रचंड संतप्त झालेल्या 12 विरोधी पक्षांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वरिष्ठ सभागृहात ज्या पद्धतीने रविवारी 2 कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्या पक्षांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे, त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलंगणा राष्ट्रीय समिती, माकपा, भाकपा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक व आम आदमी पार्टी यांचा समावेश आहे. आजच्या प्रकाराने लोकशाहीचा खून झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी दिली. उपसभापतींनी लोकसभेची सर्व मूल्ये पायदळी तुडवली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कृषी विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढत असल्याची टीका करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. "जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार
कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स
"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"
PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...