मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही एकत्र लढण्याची भूमिका घेतली. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद आणखीच वाढला.
एकीकडे काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक घटकपक्षही नाराज असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारला या घटक पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याने सरकारनं विधानसभेत मजबूत बहुमत सिद्ध केले होते. परंतु सरकार या घटक पक्षांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या पक्षांची पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक सुरू केली आहे. शेकापच्या प्रदेश कार्यालयात या पक्षांची बैठक सुरू आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप या पक्षांनी केला आहे. घटकपक्षांच्या ८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र आम्हाला वारंवार डावलण्यात येत आहे अशी भावना घटकपक्षांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळेच यापुढे काय रणनीती करायची? हे ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते.
बैठकीत कोण कोण सहभागी?
शेकापचे आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि इतर डाव्या पक्षांचे नेते उपस्थित आहेत. महाविकास आघाडीनं लक्ष न दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याचं सांगितले जात आहे. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमधील विसंवाद आणि आता त्यात घटक पक्षांची नाराजी यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. हे सरकार त्यांच्या भांडणामुळेच पडणार आहे असं वारंवार विरोधी पक्ष भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारमधील अनेक नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या घटकपक्षांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) दूर करणार का? हे पाहणं गरजेचे आहे.