MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:07 IST2024-10-22T15:01:42+5:302024-10-22T15:07:21+5:30
Maha Vikas Aghadi Seat Sharing News: काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील खेचाखेचीमुळे महाविकास आघाडीचं लांबलेलं जागावाटप लवकरच जाहीर होणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
Maharashtra Election 2024 MVA: काही जागांवरून महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा मंदावली होती. काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्यानंतर तिला वेग आला असून, काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत बोलणी करण्याची जबाबदारी टाकली. त्यानुसार आज बाळासाहेब थोरात यांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंसोबत तब्बल अडीच तास थोरातांची चर्चा चालली.
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, "शरद पवारांशी चर्चा केली आहे. कसा मार्ग काढायचा यावर आमची चर्चा झाली आहे. मला आता फार अडचण वाटत नाही. एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. ज्या काही जागा शिल्लक आहे, त्यावर प्रत्येकाला वाटत की, आपला उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे. हा वादाचा नाही, चर्चेचा विषय आहे."
थोरातांची शरद पवार-उद्धव ठाकरेंसोबत काय झाली चर्चा?
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, "उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे आणि शरद पवारांना काय वाटतं, या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत. आता आम्ही एकत्र बसून मार्ग काढू. थोड्या जागा आहे, त्यावर आमची चर्चा चालू आहे. आमची दिल्लीत चर्चा झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बैठक घेत आहोत", अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
खासदार अनिल देसाई म्हणाले, "आज दुपारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आहे. ज्या काही शिल्लक राहिलेल्या जागा आहेत, त्यावर सकारात्मक निर्णय होईल. महाविकास आघाडीचे जागावाटप होईल. उमेदवारांची घोषणा होईल. मीडियामधून खोडसाळपणा होतोय, तो त्वरित थांबवण्यात यावा", अशी भूमिका देसाईंनी मांडली.