Pankaja Munde Maharashtra Elections 2024: लोकसभा निवडणुकीत परावभ झाल्यानंतर भाजपानेपंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवले. त्यामुळे आता माजी खासदार प्रीतम मुंडेंचे विधानसभा निवडणुकीत पूनर्वसन होणार का? या प्रश्नाभोवती चर्चा होत आहे. याचसंदर्भात पंकजा मुंडे यांना जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत व्हिडीओ'चे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडेंची मुलाखत घेतली.
भाजपाने सांगितलं, तर प्रीतम मुंडे विधानसभा लढवणार का?
विधानसभा निवडणूक लढा असं प्रीतम मुंडेंना सांगितलं गेलं, तर...? या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "सांगितलं तर लढवू. मी तर म्हणतेय की, २५ आमदार निवडून आणण्यासाठी मोकळं राहायचं आहे. ताईंना (प्रीतम मुंडे) जर सांगितलं, तर आम्ही लढवू."
याच प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, "पण, कसं सांगणार, माजलगावमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार आहे. सांगणार कसं? आपण एकदम जाऊन कुणाला म्हणणं बरोबर नाही. शेवटी मी राज्यातील माझ्या समुदायाची एक नेता आहे. आणि मुंडे साहेबांनंतर लोकांनी मला जे स्थान दिले, त्याच्यामध्ये मी फक्त माझंच बघणार, माझ्याच कुटुंबाचं बघणार हे काही बरोबर नाही."
मी वाईट कार्यकर्ती होते का? पंकजा मुंडे काय बोलल्या?
"आता मी काय वाईट कार्यकर्ती होते का की, मला पाच वर्षे कुठलेही पद दिले नाही. मीही चांगलीच होते. मी काय वाईट होते का? मी मंत्री होते, राज्याच्या कोअर कमिटीमध्ये होते. देवेंद्रजींच्या खालोखाल मी २०१९मध्ये सभा घेतल्या. आमदारांना निवडून आणलं. पाथर्डीची सीट आणली. मी आणले नाही का? मग मी चांगली नव्हती का?", असा मिश्किल सवाल पंकजा मुंडेंनी केला.
"जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीही झालात, असं तुम्ही म्हणालात', यावर पंकजा मुंडे हात जोडून हसतच म्हणाल्या, "आता तुम्ही लोकांनी माझ्या करिअरचं फार मोठं वाटोळ केलं. पण, माझं म्हणणं आहे की, मीपण चांगलीच होते ना? तरीही मला पाच वर्षे संघटनेचाच अनुभव घ्यायला दिला, तर तो मी घेतला. चांगल्या कार्यकर्तीचं लक्षण हे आहे की, जे पक्ष देईल ते स्वीकारावं", असे उत्तर पंकजा मुंडेंनी दिले.