‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण
By प्रविण मरगळे | Published: December 17, 2020 12:54 PM2020-12-17T12:54:49+5:302020-12-17T12:56:58+5:30
दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.
मुंबई – कृषी कायद्याच्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे, मात्र एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे, कृषी कायद्याबाबत होणाऱ्या बैठकीपूर्वी अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, देशात शेतकरी आंदोलन करत आहे, सुप्रीम कोर्टानेही केंद्राला चर्चा करण्याचं सांगितलं आहे, आमची भूमिका मान्य करा अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, दिल्लीत हे आंदोलन चिघळलं आहे, त्यामुळे कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल करण्याचे निर्णय घेतले जातील, पण बिल संपूर्ण रद्द करावं ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आज त्याचबाबत महत्त्वाची बैठक होत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच या बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा, परंतु सगळ्यांशी चर्चा करू, मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले, त्याचसोबत दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, यंदा ३१० लाख टन साखर तयार होईल, तेवढी साखर परदेशात निर्यात केली जाईल, पण साखरेचा दर ३१ रुपयांवरून वाढवावा त्यामुळे ५ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असं अजितदादांनी सांगितले, तसेच लवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे, यात केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाही असं अजित पवार म्हणाले, तर मेट्रो कारशेडबाबत संध्याकाळी ५ वाजता बैठक होईल अशी माहिती अजितदादांनी दिली.