मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमत ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला असा गंभीर आरोप त्यांनी लावला होता. यावरुन आता विरोधी पक्ष भाजपाने टीका केली असताना वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला. राज्यातील काही अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या पोलिसांनी सरकार पाडण्याचा कट रचला त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, हा सरकारविरोधातील द्रोह आहे, त्या अधिकाऱ्यांना मोक्का आणि एनआयए अंतर्गत पकडले गेले पाहिजे अशी आमची विनंती आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच जर अनिल देशमुख यांनी हे केले नाही तर त्यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही धरणे धरु, आंदोलन करु, पोलीस अधिकारी असले तरी त्यांना द्रोह करण्याचा अधिकार नाही. शिक्षा झालीच पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे. हा बॉल आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात आहे त्यामुळे याबद्दल काय करायचं ते त्यांनी ठरवावं असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत - भाजपा
गृहमंत्र्यांच्या बुद्धीची किव येते, गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करताना १०० वेळा विचार करावा, ज्या अधिकाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत त्या महिला आहेत. कोणत्याही महिला अधिकाऱ्याचा अपमान करणे योग्य नाही, शरद पवारांकडून गृहमंत्र्यांनी क्लासेस घ्यावेत. संजय राऊतांनीच घरचा आहेर दिला ते बरं झालं. शरद पवारांसारख्या नेत्याचं नाव घेतात तेव्हा आपण काय बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे असा टोला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला.
मग नेत्यांचा काय उपयोग? - खा. संजय राऊत
गृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खा. संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही. काही अधिकाऱ्यांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते गृहमंत्री अनिल देशमुख?
पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माझ्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.
पाहा गृहमंत्री अनिल देशमुख यांची संपूर्ण मुलाखत