मुंबईः रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी सदाभाऊ खोतांनी राज्यपालांकडे सादर केली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, यासंदर्भातील पत्र राज्यपालांना दिल्याचे सदाभाऊ खोतांनी सांगितले आहे.
राज्यात विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या 12 जागा रिक्त आहेत. या जागांमध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार, सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे सुचवण्यात आली आहेत. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीच्या सरकारने आधीच बारा जणांच्या नावांची राज्यपालांकडे शिफारस केली आहे. त्यासाठी घालून देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदत संपली तरीही राजभवनाकडून अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. यातच आता सदाभाऊ खोतांनी राज्यपालांची भेट घेऊन ही नावे सुचवल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
याचबरोबर, सदाभाऊ खोतांनी राज्यपालांकडे इतरही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्या सदाभाऊ खोतांनी राज्यपालांकडे केल्या आहेत. राज्यपालांच्या भेटीदरम्यान सदाभाऊ खोत यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दिपक भोसले, राज्य कार्यकारणी सदस्य सुहास पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक पगार, प्रा. एन. डी. चौगुले, निताताई खोत, भानुदास शिंदे, लालासो पाटील, जितु आडिलकर उपस्थित होते.