नागपूर - काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले, इंद्र देव फार बदमाश होता आणि फार लालचीही होता. मात्र त्याच्यावर संकट आले तर तो मोठ्या देवांकडे धावायचा. इथे तर दोन्ही इंद्र आहेत. वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्रांचे काय करायचे, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचे आहे." नागपुरातल्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
पुढे ते म्हणाले, सरकार रोज जीआर काढत आहे. सरकारनं जीआर काढल्यानंतर मी कलेक्टरला सांगायचो की, तातडीनं अंमलबजावणी करा, तेव्हा कलेक्टरच सांगायचा, साहेब दोन ते तीन दिवस थांबा, कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर हा जीआर बदललेला पाहाल. दर आठवड्याला जीआर काढायचा आणि दुसऱ्याच आठवड्यात तो जीआर बदलायचा. आचारसंहिता लागू करण्याच्या आधीही कॅबिनेटची बैठक त्यांनी घेतली होती, त्यावेळी तर 147 जीआर काढले. नंतर ते जीआर पुढच्या तीन वर्षाला लागू होतील, असं समजलं, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.