Chiplun Flood: “पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:46 AM2021-07-26T08:46:44+5:302021-07-26T08:53:22+5:30
Chiplun Flood: पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या.
नागपूर: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यातच काँग्रेसने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली असून, पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असे म्हटले आहे. (nana patole criticised narayan rane over flood situation in state)
राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख
पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही
नारायण राणे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही. मात्र, पुरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करु नये. तसेच मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, या शब्दांत नाना पटोले यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. तर, दुसरीकडे, आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. दरडी कोसळायला लागल्या आहेत. पुरामुळे शेती, घरदार आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत केली जाईल. दोन-चार दिवसात आर्थिक नुकसानीचा अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल. सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.