गोंदिया : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. त्या दृष्टीने पक्षाने तयारी केली आहे. निवडणुका स्वबळावरच, असा पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचादेखील सूर आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
पटोले रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाचे वाटोळे झाले आहे. मागील सात वर्षांपासून देशाच्या विकासाला उतरती कळा लागली आहे. भाजप सरकारने देशाला चीनचे वाढते वर्चस्व, कोरोनामुळे वाढलेले मृत्यूचे प्रमाण आणि त्यामुळे जळणाऱ्या चिता आणि यातूृन आलेल्या संकटामुळे देशवासीयांची वाढविली चिंता असे तीन ‘चि’ देशाला दिल्याची टीका त्यांनी केली. तसेच गोंदिया येथूनच त्यांनी महाराष्ट्राच्या दाैऱ्याची सुरुवात केली.
पटोले म्हणाले, भाजप सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारलादेखील काम करू देत नसून त्यात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकारचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप करीत या सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आणण्यासाठी व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा करीत असल्याचे ते म्हणाले.
एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलासध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशात १० जूनला एमबीबीएसच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण वाढली असून, या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.