मुंबई: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) खरा चेहरा देशासमोर आणला असून, सत्यपाल मलिक यांनी मोदींबद्दल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतकऱ्यांचा मारेकरीच करू शकतो. मोदी, तुम्ही काहीही म्हटलात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान ७०० शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, तुम्हीच शेतकऱ्यांचे मारेकरी आहात, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले, याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकारी तसेच भाजपचे सर्व नेते मोदीसमोर मान खाली घालून गप्प बसतात, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
शहीद शेतकऱ्यांबद्दल मोदींचे वक्तव्य हे संतापजनक
सत्यपाल मलिक यांनी धाडस करून सत्यकथन केले आहे. यापूर्वीही मलिक यांनी शेतकरी आंदोलन व कृषी कायद्यांबद्दल परखड मत व्यक्त केले होते. शहीद शेतकऱ्यांबद्दल मोदींचे वक्तव्य हे संतापजनक आहे. एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान आहे, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवळा असण्याचे कारणच नाही. तसे असते तर शेतकऱ्यांची रक्तबंबाळ होईपर्यंत डोकी फोडली नसती, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला नसता, शेतक-यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकले नसते, शेतक-यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून मारणा-याला अभय दिले नसते, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थोडा आदर्श राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घ्यावा. केंद्र सरकार व भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणे त्यांनी बंद करावे. राज्यपालांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. सत्याची बाजू घ्यावी, संविधानाच्या तत्वानुसार काम करावे. तुमच्या कामाचे मुल्यमापन इतिहास करेल तेव्हा आपण काय आदर्श ठेवणार आहोत याचा विचार करावा, अशी कोपरखिळी पटोले यांनी कोश्यारी यांना मारली.