लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखविल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
पटाेले हे सध्या विदर्भात विविध ठिकाणी भेटी देत आहेत. गुरुवारी रात्री बुलडाणा येथून अकोल्याला येत असताना त्यांनी महामार्गावरील पारस फाटा येथील एका हॅाटेलला भेट दिली. या हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी लॉकडाऊन काळात स्थलांतर करणाऱ्या मजुरांना विनामूल्य जेवण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून त्यांचा गौरव केला होता. याच मुरलीधर राऊत यांनी पटाेले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी भाषण करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.
पटोले म्हणाले, ‘आता मघाशी अमानकर साहेबांनी म्हटलं की नानाभाऊंना मुख्यमंत्री करायचं आहे. मग हे कसं घडणार याच्यानंतर. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जाताना तुमच्या कलेक्टरला सांगून गेलो. यांनी अपील केली, मग झालं ना. मग कसं वाजवायचं हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही पाहिलं मला विधानसभेत. म्हणून तुम्हाला सांगतो सगळेजण एकजुटीने रहा. मुरलीधर राऊत तुम्ही खूप समाजसेवा केली. आता तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा सरळ. नानाभाऊंना मुख्यमंत्री बनवायचं आहे महाराष्ट्राचं. आपला माणूस आहे. तिथं कोण उभं आहे हे माहीत नाही. पण त्याच्याजवळून करायचं आपल्याला हे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही तर हे असंच फिरवत रहायचं. कारण त्याला कुणाला काही समजतच नाही ना. सगळ्यांचं दु:ख ज्याला समजेल तोच करेल की नाही. तुम्ही पाहिला ना माझा संयम.’
हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुग्ण ५० हजार, इंजेक्शन दिले पाच हजार
अमरावती : केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अगोदर देशवासीयांना कोरोनाच्या खाईत लोटले. लसी नाही, ऑक्सिजन नाही. औषधांची वानवा आहे. आता काळ्या बुरशीचे संकट उभे ठाकले आहेत. राज्यात या आजाराचे ५० हजार रुग्ण असताना केंद्र सरकारने केवळ पाच हजार इंजेक्शन दिले, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेे यांनी शनिवारी अमरावती येथे केली.