नाना पटोलेच प्रदेशाध्यक्षपदी; काँग्रेसमध्ये माेठे फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 08:34 AM2021-02-06T08:34:30+5:302021-02-06T08:36:07+5:30
Congress News : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटनेत मोठे फेरबदल केले असून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नवी दिल्ली/मुंबई : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटनेत मोठे फेरबदल केले असून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पटोले यांच्या सोबतीला सहा कार्यकारी अध्यक्षही नेमण्यात आले असून त्यात ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. तसेच संसदीय मंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करतानाच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यकारिणीत सहा कार्यकारी अध्यक्ष, १० उपाध्यक्ष व ३७ सदस्य असतील. पण सरचिटणीस, सचिवांची नियुक्ती तूर्त करण्यात आलेली नाही. स्थानिक स्तरावरील निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी १९ सदस्यांची समिती, स्क्रीनिंग व समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्षांसह नव्या पदाधिकाऱ्यांची नावे शुक्रवारी जाहीर केली. नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित होती. फक्त घोषणेची औपचारिकता बाकी होती. ती शुक्रवारी पूर्ण करण्यात आली. आक्रमक नेते अशी पटोले यांनी ओळख आहे. शिवाय ते विदर्भातील आहेत. पटोले यांच्या निवडीमुळे पक्षात चैतन्य येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संघटनात्मक फेरबदल करताना कार्यकारी अध्यक्ष पदावर यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम या दोन मंत्र्यांच्या जागी प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न
१० उपाध्यक्ष आणि ३७ सदस्य प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही पुनर्रचना स्थानिक निवडणुकांंच्या रणनीतीसाठी समिती
उपाध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश बागवे, मोहन जोशी, हुसेन दलवाई, रणजीत कांबळे, कैलास गोरंट्याल, भाई नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिकराव जगताप.
यामुळे पटोले यांच्या निवडीला झाला उशीर
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या पटोलेंची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली तर जुन्याजाणत्या नेत्यांवर अन्याय होईल, अशी भावना असल्याने व तसे पक्षश्रेष्ठींना सांगितले गेल्याने पटोले यांच्या निवडीस उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पटोलेंची निवड झाल्यास काँग्रेसमध्ये फूट पडेल, असेही बुजूर्गांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. कार्यकारी अध्यक्षांकडे विदर्भ, कोकण, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी प्रांतांची जबाबदारी दिली जाईल.
मंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश
संसदीय मंडळात बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश (बाळू) धानोरकर, रणजीत कांबळे, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दिकी, आशिष देशमुख, डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुजफ्फर हुसेन, मोहन जोशी या वरिष्ठ नेत्यांचा समावेश केला आहे.