- राजेश शेगाेकार
अकाेला : राजकारणाच्या सारीपाटावर एकही सत्तेची साेंगटी काँग्रेसच्या ताब्यात नसलेल्या अकाेल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांचा शुक्रवारी झालेला दाैरा हा सुपरफास्ट हाेता. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जिल्ह्यात आल्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या हाेत्या; मात्र त्यांच्या संपूर्ण दाैऱ्याचे नियाेजन हे केवळ पाहूणचारासारखेच झाले. त्यांना मुुंबईत सहज भेटू शकतील अशा सर्वच नेत्यांच्या घरी नानांनी पायधूळ झाडली; मात्र संपूर्ण दाैऱ्यात जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटन कार्याचा आढावा झाला नाही, पक्षाची वाताहत का झाली याबाबत सामान्य कार्यकर्त्यासाेबत संवाद साधून कारणे जाणून घेतली गेली नाहीत फक्त नानांची वारी नेत्यांच्या घरी एवढेच काय ते दाैऱ्याचे स्वरूप हाेते.
वसंतराव साठे यांच्यासारख्या आयात उमेदवारालाही दोन वेळा खासदार करणारा अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी असे म्हणण्याचे कारण म्हणजे याच मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेसाठी प्रभावी ‘चेहरा’ सापडणे ही कठीण झाले आहे. स्व.नानासाहेब वैराळे हे काँग्रेसचे अकाेल्यात निवडून आलेले शेवटचे खासदार त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. १९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अॅड.प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन भाजपला सहा वर्षांची विश्रांती देण्यात यश आले मात्र अॅड.आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपने ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध करून काँग्रेसच्या ‘हाता’तून एक-एक सत्ताकेंद्र हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. हेच चित्र विधानसभा मतदारसंघाचे आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका अगदी महापालिकेतही उत्साहवर्धक स्थिती नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याची माेठी गरज असतानाही त्याच त्या नेत्यांच्या चरणी महत्त्वाची पदे देण्याची परंपरा अजूनही कायम असल्याचा आराेप काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांकडून हाेताे आहे. गेल्या काही वर्षात संघटना म्हणून काँग्रेसची वाढ झाली नाही व त्याचेच प्रत्यंतर निवडणूक निकालांमध्ये दिसून आले. आता नाना पटाेले यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. कार्यकर्त्यांसाठी ही बाब उत्साहवर्धक असली तरी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळणे क्रमप्राप्त आहे. या पृष्ठभूमीवर नानांचा दाैरा हा संघटनेतील सामान्य कार्यकर्त्याला बाेलते करणारा हाव हाेता, सतरंजी उचलणारे कार्यकर्ते पक्षाला जिवंत ठेवतात ते मुंबईत जाऊन व्यथा मांडू शकत नाही त्यामुळेच शुक्रवारचा पाहूणचार दाैरा नेत्यांसाठी ओळखी घट्ट करणारा ठरला.
अशी हाेती व्यस्तता
गुरुवारी रात्री बारा वाजता सुरू झालेला नानांचा दाैरा हा दाेन नेत्यांच्या घरी आदरातिथ्य स्वीकारून संपला, शुक्रवारी सकाळी जनता बाजारात एक सत्कार कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद अन् त्यानंतर पुन्हा नेत्यांच्या घरी पायधूळ झाडत औपचारिकता म्हणून काेविड आढावा घेऊन पुन्हा एका नेत्याकडे चहापान करून संपला.
काेणाकडे जायचे यावरून झाले वादंग
प्रदेशाध्यक्ष पटाेले यांचा दाैरा निश्चित झाल्यानंतर त्यांचा अकाेल्यातील वेळ कसा नियाेजित करायचा यामध्ये बैठक घेऊन विचारमंथन करण्यापेक्षा काेणाच्या घरी चहा, कुठे जेवण, कुठे सदिच्छा भेट यांच्या नियाेजनातही वादंग झाल्याची माहिती आहे. एका पदाधिकाऱ्याचा कार्यक्रम नियाेजित नव्हता मात्र त्यांनी थेट नानांना आमंत्रण देऊन मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची तक्रारही स्वराज्य भवनाच्या प्रांगणात सर्वांसमक्ष केली त्यानंतर नानांनी तिथेही भेट देऊन आदरातिथ्याची यादी वाढविली.