Pegasus : 'नाना पटोले यांचाही फोन टॅप झाला होता', काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 01:00 PM2021-07-20T13:00:19+5:302021-07-20T13:02:38+5:30
pegasus spyware: पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठीत लोकांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात येतोय.
मुंबई: सध्या देशात पेगासस(pegasus) सॉफ्टवेअरची चर्चा सुरू आहे. पेगाससद्वारे भारतातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच, ही हॅकिंग केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप होतोय. या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचाही फोन टॅप (Phone Tap) झाल्याचा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशो बोलताना थोरात म्हणाले की, नाना पटोले यांचा फोन 2017-18 मध्ये टॅप झाला होता. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावेळी थोरातांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरही भाष्य केले. राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या 12 आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते. राज्यपालांना हा निर्णय लवकर द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
केंद्राकडे ओबीसी डाटा
यावेळी थोरातांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. केंद्र सरकारकडे ओबीसींचा डाटा आहे. ती जनगणना मिळावी यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे, पण तो डाटा सहज मिळावा असं वाटतं. तो मिळाला नाही तर राज्य मागासवर्ग आयोगातर्फे हे काम सुरू आहे, अशी माहिती थोरातांनी दिली.