मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादीकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. (CM Uddhav Thackrey and Ajit Pawar keep wath on me: Nana Patole.)
नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला आहे.
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. ते पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांवर प्रतिक्रिया देऊ शकतात. राज्यातील नेत्यावर प्रतिक्रिया हवी होती तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घ्यायला हवी होती, असे ते म्हणाले.
शरद पवार काय म्हणालेले...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघडीच्या पाठीत सुरा खुपसला जात आहे. ती बिघाडीच्या मार्गाने जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशी नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला आहे. बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.