नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला खुप फरक पडत नाही : प्रफुल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:36 AM2021-07-17T07:36:38+5:302021-07-17T07:37:12+5:30
Praful Patel on Nana Patole : काँग्रेस प्रभारी पाटील काय म्हणतात, हे जास्त महत्वाचे आहे, प्रफुल पटेल यांचं वक्तव्य.
नागपूर : महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. ते ठाकरे सरकारचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे मार्गदर्शकही आहेत. तेच पुढेही राहतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दररोज इकडे-तिकडे काय-काय बोलतात. त्यावर आम्ही रोज-रोज काय उत्तर द्यायचे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला. शुक्रवारी ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
पटेल म्हणाले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे शरद पवार यांना भेटायला गेले होते. तेव्हा पवार हे पटोलेंबाबत जे काही बोलायचे ते बोलले. त्यानंतर एच. के. पाटील यांनी दिलेला इशारा तुम्हाला माहीतच आहे. पटोलेंच्या बोलण्याने खूप फरक पडत नाही. मला काँग्रेस प्रभारी पाटील काय म्हणतात, हे जास्त महत्वाचे आहे. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, अशी रोखठोक भूमिका पटेल यांनी मांडली.
शिवसेनेत कोण नाराज आहे हे माहीत नाही, पण आमच्या पक्षात कुणी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे कन्सल्टंट आहेत. भाजपचेही होते. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांनी कन्सल्टन्सी सोडली असल्याचे स्पष्ट केले आहे. ते कुणाला भेटत असतील तर भेटू द्या. शेवटी राजकारणाची दिशा कुण्या एका व्यक्तीमुळे ठरत नसते, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत राजकीय घडामोडी घडत आहेत.
महामंडळांवरील नियुक्त्यांचा फार्म्युला ठरला
महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळांसह इतर समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी एक फार्म्युला ठरला आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार व शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे या सहा नेत्यांनी आपसात बसून कोणत्या पक्षाकडे कोणते महामंडळ राहील, हे ठरवायचे आहे. त्यानुसार आपापल्या कोट्यातील जागा भरल्या जातील, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.