ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचाच प्रत्यय गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आला. कामे वगळणे व तिलारी डावा कालवा फुटल्याच्या मुद्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद टोकाला जात असल्याचे पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केेले.
विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे इतिवृत्तात बदलण्यात आली असल्याचा आरोप करत सभागृहाने मंजूर केलेली कामे परस्पर बदलण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का, असा सवाल राणे यांनी केला, तसेच आपल्याकडून कामांच्या याद्या मागितल्या जातात; परंतु त्या मंजूर केल्या जात नसल्याचे नितेश राणे यांनी सभेत सांगितले. यावर आ. वैभव नाईक यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी सदस्यांनी त्यास विरोध केला, तसेच आम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न केला आहे. त्यांनी उत्तर द्यावे, असे राणे यांनी यावेळी सांगितले. यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर यापुढे कामे बदलली जाणार नसल्याचे सांगत या वादावर पालकमंत्री सामंत यांनी पडदा टाकला.
तिलारी कालव्यावरून पुन्हा बाचाबाची
यानंतर तिलारी डावा कालवा फुटल्याच्या मुद्यावरून भाजपचे राजेंद्र म्हापसेकर यांनी आपली भूमिका मांडली. याला शिवसेनेच्या बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपावरून राणे- राऊत यांच्यात पुन्हा जोरदार बाचाबाची झाली.