नवी दिल्ली - आज झालेल्या मोदी सरकारच्या विस्तारामध्ये १५ कॅबिनेट मंत्र्यांसह एकूण ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांनाही आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने केंद्रात मंत्रिपद दिलं का या प्रश्नावरही राणेंनी उत्तर दिलं आहे. (Did BJP make you a minister at the Center to support Shiv Sena? Narayan Rane said I don't know)
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, केंद्रात मंत्रिपद दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आता मंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल ती योग्यपणे सांभाळेन. तसेच त्यांच्या आज्ञेप्रमाणे काम करेन. यावेळी आतापर्यंच्या राजकीय प्रवासाबाबत विचारले असता नारायण राणे यांनी राजकीय प्रवासाबाबत थोडक्यात सांगू शकत नाही असे सांगितले.
दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रात मंत्री करण्यात आले का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारले असता नारायण राणे यांना माहिती नाही असे उत्तर दिले. तसेच आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता एवढ्यातच त्याबाबत बोलता येणार नाही. मात्र पक्ष जी जबाबदारी पार पाडेन असे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच घटनेतील तरतुदी त्यांनी वाचल्या पाहिजेत, असा सल्लाही दिला. दरम्यान, आज मंत्रिपदाची शपथ घेताना मिळालेला पहिला क्रमांक हा ज्येष्ठतेमुळे मिळाला असल्याचेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.