- सुहास शेलार मुंबई : बहुप्रतिक्षित चिपी विमानतळासंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा श्रेयवादाचा ‘सामना’ रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हे विमानतळ बांधून तयार असून, नागरी उड्डाण संचालनालयाची (डीजीसीए) परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासी विमान वाहतुकीचा शुभारंभ करता येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन व्हावे, यासाठी विनायक राऊत आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले, परंतु प्रत्येकवेळी उद्घाटनाची तारीख लांबल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. आधी कोरोनामुळे अडथळे आले आणि नंतर डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीबाबत आक्षेप घेतल्याने सिंधुदुर्गातून विमान उड्डाणास विलंब झाला. आता डीजीसीएच्या निकषांनुसार धावपट्टीचे काम पूर्ण केल्यानंतर आयआरबी कंपनीने २८ जून २०२१ रोजी परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, अद्याप केंद्रीय पथकाने पाहणी न केल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत विनायक राऊत यांनी नुकतीच नवनिर्वाचित हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी पुढील आठ दिवसात ‘रिझल्ट’ देतो, असे आश्वासन राऊतांना दिले. पण, १० दिवस उलटले तरी डीजीसीएचे पथक सिंधुदुर्गात फिरकले नाही. आता नारायण राणे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी राणे यांनी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चिपी विमानतळाच्या मंजुरीबाबत चर्चा केली. ‘परवानगीचे सोपस्कार तातडीने पूर्ण करून येत्या महिनाभरात विमानतळाचे उद्घाटन करू. मी स्वतः उद्घाटनाला उपस्थित राहीन’, अशी ग्वाही शिंदे यांनी त्यांना दिली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची ही संधी भाजप हातातून जाऊ देणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, यासाठी राणे प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुन्हा चिपी विमानतळाच्या श्रेयवादाचा रंगणार ‘सामना’, राऊतांपाठोपाठ नारायण राणेंनी घेतली हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 12:26 PM