मुंबई - राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबईसह राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Jana Aashirwad Yatra ) दरम्यान, काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Narayan Rane) दरम्यान, या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेना आणि राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. (Narayan Rane's warning to the Thackeray government who filed a case against Jana Aashirwad Yatra )
नारायण राणे यांनी आज जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे करा. मात्र दिल्लीत आमची सत्ता आहे हे लक्षात असू द्या. तुमच्यापेक्षा आम्ही वर आहोत. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकराचे गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण करणाऱ्या शिवसैनिकांनाही नारायण राणे यांनी टोला लगावला. त्यांना गोमुत्र शिंपडायचं असेल तर शिंपडू द्या, गोमुत्र प्यायचं असेल तर पिऊ द्या, मात्र आधी मन तरी शुद्ध करा. माझ्यामुळे जर त्यांच्या वडिलांचं स्मारक अपवित्र होणार होतं तर उद्धव ठाकरेंनी मला अडवायला हवं होतं. मी असतो तर अडवलं असतं. पण काल तिथे कुणीचं नव्हते. नंतर पैसे देऊन हे नाटक करून घेतलं, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.
आज सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही नारायण राणे यांनी टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी हिंदुत्त्वाची होती. त्यांनी सत्तेसाठी कधी या हिंदुत्ववादी विचारसरणीशी तडजोड केली नाही. उलट आजची शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली आहे आणि आज सोनिया गांधींसोबत होणारी बैठक म्हणजे लाचारीचा एक भाग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत हे सरकार उदासिन आहे. त्यामुळेच ते आरक्षणाबाबत टाळाटाळ करत आहेत. तसेच आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
दरम्यान, भाजपने काल आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी या पोलीस ठाण्यांत आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.