मुंबई - शिवसेना(Shivsena) वाढली त्यात आमचाही मोठा सहभाग आहे. आत्ता जे अपशब्द वापरतायेत त्यावेळी ते कुठेही नव्हते. आमचा बंदोबस्त करायचा असेल तर करू द्या. पोलिसांनी सगळं पाहावं. चिपळूणमध्ये १७ माणसं होती तिथं प्रचंड गर्दी असं सांगितले. त्यापुढे गेलो तर १३ माणसं. आमच्या घरावर किती माणसं आली मोजली नाही. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केले. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का? तुम्ही कुणीही माझं काही करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय अशा संतप्त भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
पत्रकार परिषद घेत नारायण राणे म्हणाले की, माझ्या लढ्यात भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहिली. त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो. या नेत्यांनी मला पाठबळ दिलं. मी असं काय बोललो ज्यानं राग आला. भूतकाळात एखादी गोष्ट घडल्यानंतर त्यावर गुन्हा कसा होतो? १ ऑगस्टला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं उद्घाटन होतं. शिवसेना नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? देशाबद्दल अभिमान आहे म्हणून ते संतापाने बोललो. शिवसेना भवनाबद्दल कुणी काही बोललं तर थोबाड फोडा हे आदेश नाहीत का? हा योगी आहे की ढोंगी, चप्पलाने मारले पाहिजे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारलं हे शब्द वापरलेले चालतात? केंद्रीय मंत्री अमित शाह यांना निर्लज्ज असा शब्द वापरला ते चालतं का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतात पकडा त्यांना, काही दरोडा घातलाय का? राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सालियानच्या आत्महत्येत कोण मंत्री उपस्थित होतं? का त्याचा छडा लागला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय घडलं? कुठल्या मंत्र्याला अटक केली? आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असंही सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.
जनआशीर्वाद यात्रा यापुढेही सुरूच राहील
गेल्या काही दिवसांपासून माझी जनआशीर्वाद यात्रा सुरु होती. काहीजण माझ्या मैत्रीचा फायदा उचलतात हेदेखील माझ्या लक्षात आलं आहे. ही जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधानांना ७ वर्ष झाली. या कालावधीत केंद्राने आणलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणं यासाठी ही यात्रा काढली होती. देशाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. सर्व नवनियुक्त मंत्र्यांना राज्यात जाऊन जनतेची आशीर्वाद मागून खात्यातील कामकाजाला सुरुवात करा अशी सूचना पंतप्रधानांनी दिली होती. १९ ऑगस्टपासून माझ्या जनआशीर्वादाला यात्रेला सुरुवात झाली. दोन दिवस खंड पडला आहे. पुन्हा जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरुच राहील असं राणेंनी सांगितले.