मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आल्याने काल राज्यात मोठा राजकीय राडा झाला होता. (Nitish Rane Criticize Thackeray Government ) दरम्यान, नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या जुहू येथील निवासस्थानावर धडक दिली होती. या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शाबासकी दिली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमधून राज्यातील परिस्थिती पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, ‘’तर कालची घटना म्हणजे पश्चिम बंगालप्रमाणे राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचार होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांवर सुरक्षेची जबाबदारी असते. मात्र इथे मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. आता अशा ठकांपासून सुरक्षिततेसाठी एकच उपाय आहे तो म्हणजे राष्ट्रपती राजवट’’, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी राजनीती चित्रपटातील एक सीन शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. या व्हिडिओत मनोज वाजपेयी यांचा डायलॉग आहे. आभाळाकडे थुंकणाऱ्याला कदाचित हे माहिती नाही की, ती थुंकी त्याच्यावरच पडणार आहे, करारा जवाब मिलेगा... करारा जबाव मिलेगा.... हा डायलॉग आहे. नितेश यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी त्या ठिकाणी असतो तर उद्धव ठाकरेंच्या कानाखाली मारली असती, असे राणे म्हणाले होते. दरम्यान, रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती. त्यानंतर दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात दाखल करण्यात आले होते. तेथे रात्री उशिरा त्यांना जामीन मंजुर झाला होता.