रत्नागिरी : मराठा आरक्षणासाठी एकीकडे भाजपचे खासदार संभाजीराजे नवे आंदोलन उभं करत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी संभाजीराजेंवरच संशय व्यक्त करत टीका केली होती. पण, 'छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला आहे.रत्नागिरी येथील लांजा इथं पत्रकारांशी बोलत असताना विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीकेचा चांगलाच समाचार घेतला.खासदार विनायक राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे, ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आहेत.मात्र संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधी होऊ शकत नाही. संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे, असं माझं मत असल्याचा टोला राऊत यांना नारायण राणे यांना लगावला आहे.'नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलत असतो. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही, त्यामुळे नारायण राणेंनी हे त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे', अशी टीकाही राऊत यांनी केली.तसंच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या काही कामधंदा राहिलेला नाही.दिल्लीवाल्यांनी सुद्धा त्यांना बाजूला केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं सध्या एकच काम आहे ठाकरे सरकारवर टीका करणे, बाकी त्यांना काही काम नाही, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.मध्यंतरी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांच्यावर खोचक अशी टीका केली होती. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी उपस्थितीत केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये संभाजीराजेंनी कोणाचंही नाव न घेता इशारा दिला आहे.
'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे' असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.