मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सध्या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. भाजपानं त्यांना जाहीरनामा समितीतही स्थान दिलं. परंतु त्यानंतर सेना-भाजपाची युती झाली आणि राणेंनी बंडाचा झेंडा फडकावला, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी पुत्र निलेश राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विशेष म्हणजे तिथून सेना-भाजपा युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याची भाषा करत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी मात्र मतपेटीतून सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, असं मराठा समाजाला आवाहन केलं आहे. औरंगाबादेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सुभाष पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुभाष पाटील हे माजी शिवसैनिक आणि मराठवाडा विकास सेनेचे नेते आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या नितेश राणेंनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या युवकांना गृह खात्याने पुन्हा नोटिसा बजावल्या आहेत, त्याचा रोष नितेश राणे यांनी व्यक्त केला. मराठा समाजातील तरुणांना गुन्हेगार असल्याचं सांगत सरकारचा बदनामी करण्याचा कट असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. तसेच आता समाजाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.58 मोर्चे काढून यांना आपली ताकद दिसली नाही. आता जिथे जिथे हे उभे आहेत त्या ठिकाणी विरोधात मतदान करा, आमच्या विरोधात गेलात तर घरी बसावं लागेल हे दाखवून द्या, आता मराठा समाजाने भूमिका घेतली पाहिजे, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. सरकारला त्यांची जागा मतपेटीच्या माध्यमातून दाखवा, असंही नितेश राणे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे मोदींना पाठिंबा देण्याची भाषा करत असताना त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार नितेश राणे मात्र त्याच मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आव्हान करताना दिसून येत असल्याने राणे कुटुंबात नेमकं चाललं काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
राणेंचं भाजपाला समर्थन; पण नितेश म्हणतात, सरकारविरोधात मतदान करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 9:06 PM