मुंबई – तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर आहे म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही? ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. तुम्ही आमच्यावर किती वैयक्तिक टीका करता आम्ही सक्षम आहोत. परंतु भूमिका एकच असली पाहिजे दुटप्पी नको. मुख्यमंत्री काय बोलले तर त्यांची ती ठाकरी भाषा अन् दुसरं कुणी बोललं तर गुन्हा असं होऊ शकत नाही. जी काय कारवाई चालली आहे. ती योग्य नाही अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
नारायण राणे(Narayan Rane) यांच्या विधानामुळे राज्यात शिवसेना(Shivsena)-राणे यांच्यात संघर्ष पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, सत्ता पक्षाचे शिवसेनेचे लोकं दगडफेक करतात अन् चॅनेलवर उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) सांगितले मग हा गुन्हा नाही का? भाजपा कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार ते सहन केले जाणार नाही. आम्ही दबणारे लोकं नाही रस्त्यावर येऊन लढणारे लोकं आहोत. आमच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर दोन्ही विरोधी पक्षनेते संबंधित पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करु. कायद्याचं राज्य हवंय हे तालिबान नाही असं त्यांनी सांगितले आहे.
“भाजपा नारायण राणे यांच्या ठामपणे पाठिशी; आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...”
तसेच अवैधपणे नारायण राणेंना पोलिसांना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन पुढे सुरू ठेऊ. आमची यात्रा तुम्ही रोखू शकत नाही. पोलिसांच्या बळावर भाजपाला रोखण्याचा प्रयत्न ५० वर्ष झाला परंतु भाजपा थांबली नाही. लोकशाहीत अशाप्रकारच्या गोष्टी योग्य नाहीत असंही फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपा कार्यालयावर हल्ला केला तर सहन करणार नाही
आम्ही राडा करत नाही, हिंसाचार करत नाही परंतु आमच्या कार्यालयावर हल्ला झाले तर आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोकं आहोत. कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली नाही तर दोन्ही विरोधी पक्षनेते संबंधित पोलीस ठाण्यासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करु, इथं तालिबानी राज्य नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, परंतु कार्यालयावर कुणी चालून येत असेल तर संरक्षण करावं असं फडणवीसांनी आवाहन केले आहे.
कायद्यानं नारायण राणेंना अटक करता येत नाही
ठाकरे सरकार हे पोलिसजीवी झालंय. कोर्टाने चपराक दिल्यानंतर बदला घेण्यासाठी पोलिसांचा वापर सरकारकडून करायचं हे योग्य नाही. मी धमकी देत नाही सल्ला देतो. पोलिसांनी कायद्याने काम करावं. बेकायदेशीर काम करणारे पोलीस कुठे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. तीन पथकं नारायण राणेंना पकडण्यासाठी जातात. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही परंतु बेकायदेशीरपणे सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय. त्यामुळे नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपा ठाम उभी राहणार आहे. पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपा ठाम असल्याचं सांगितले आहे.